vakprachar arth v vakyat upyog | खालील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा

वाक्प्रचार त्यांचा अर्थ व वाक्यात उपयोग

vakprachar arth v vakyat upyog
                    वाक्प्रचार व त्यांचा अर्थ याचा दैनंदिन जीवनामध्ये खूप उपयोग होतो. दैनंदिन व्यवहारामध्ये बोलण्या बरोबरच साहित्यामध्ये वाक्प्रचारांचा वापर केला जातो. निरनिराळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये  वाकप्रचारावर आधारित अनेक प्रश्न विचारले जातात. या लेखामध्ये मराठीतील काही महत्त्वपूर्ण वाक्प्रचार यांचा अर्थ व त्यांचा वाक्यात उपयोग याची माहिती देण्यात आली आहे. वाक्यात उपयोग हे आपल्याला वापर समजून यावा यासाठी दिलेली आहे या वतिरिक्त अनेक प्रकारे आपण या वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करू शकतो.


अधीर होणे - उत्सुक होणे.
मामाला भेटण्यासाठी अजय अधीर झाला.

अन्नान होणे - गरीबीमुळे खायला न मिळणे.
लॉकडाऊन मुळे मोलमजुरी करणारे लोक अन्नान झाले.

असंतोष निर्माण होणे - चीड निर्माण होणे, राग येणे.
कंपनीच्या चुकीच्या धोरणामुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला.

अभिमान वाटणे - गर्व वाटणे.
शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम आल्याने दीपाचा सर्वांना अभिमान वाटला.

अभिवादन करणे - नमस्कार करणे.
विशाखाने आई बाबांना अभिवादन केले.

अंत होणे- मृत्यू होणे.
अपघातामुळे अशोकचा दुःखद अंत झाला.

अंदाज बांधणे - अटकळ बांधणे, तर्क करणे.
हवामानातील बदलामुळे शेतकऱ्यांनी चार दिवसात पाऊस लागण्याचा अंदाज बांधला.

अंगाची लाहीलाही होणे- अतिशय संताप येणे.
प्राण्यांवर होणारे अत्याचार पाहून अंगाची लाहीलाही झाली.

अपव्यय टाळणे- दुरुपयोग न करणे.
नेहमी पाण्याचा होणारा अपव्यय टाळावा.

अन्नाला जागणे- कृतज्ञ असणे.
कुत्रा घराची राखण करून मालकाच्या अन्नाला जागतो.

अत्तराचे दिवे जाळणे - मूर्खपणाने उधळपट्टी करणे.
विशालला लॉटरी लागल्याने त्याने अत्तराचे दिवे जाळले.

आश्चर्य वाटणे -नवल वाटणे.
नेहमी मस्ती करणारा राजू शांत बसलेला पाहून आईला आश्चर्य वाटले.

आकाश ठेंगणे वाटणे - खूप आनंद होणे.
निशांत शाळेत पहिला आलेला पाहून आई-बाबांना आकाश ठेंगणे वाटले.

आव्हान देणे - संघर्षाला आमंत्रण देणे.
पैलवानाने कुस्तीसाठी उपस्थित पैलवानांना आव्हान दिले.



आडवे होणे- झोपणे.
सकाळपासून शेतात कष्ट करणारे काका दुपारी झाडाखाली आडवे झाले.

आवर्जून पाहणे - मुद्दाम पाहणे.
कोल्हापूरला भेट दिल्यानंतर शाहू पॅलेस आवर्जून पहावा.

आभाळ कोसळणे- मोठे संकट येणे.
महापुरामुळे नदी काठच्या शेतकऱ्यावर आभाळ कोसळले.

आभाळाकडे डोळे लावून बसणे- पावसाची आतुरतेने वाट पाहणे.
शेतातील सुकत जाणारे पिक पाहून शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले होते.

आहुती देणे- बलिदान देणे.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.

आरंभ होणे - सुरुवात होणे.
देशाच्या शाळेच्या प्रवेशाने शिक्षणाला आरंभ झाला.

इनाम देणे - बक्षीस देणे.
स्पर्धेत जिंकलेल्या मुलांना पाहुण्यांनी इनाम दिले.

उदास होणे - खिन्न होणे.
राजुला गणितात पडलेले गुण पाहून त्याचे वडील उदास झाले.

उदरनिर्वाह करणे - उपजीविका करणे.
मोलमजुरी करून शामराव आपला उदरनिर्वाह करतात.

उत्तेजन देणे- प्रोत्साहन देणे .
अजयला कबड्डी मध्ये असणारी आवड पाहून सरांनी त्याला उत्तेजन दिले.

उघड्यावर टाकणे - निराधार करणे.
केशवने आईबाबांना घराबाहेर काढून उघड्यावर टाकले.

उपकार फेडणे - उतराई होणे, कृतज्ञता दाखवणे.
आपणांस मदत करणाऱ्यांचे उपकार फेडावेत.

उंबरठा ओलांडणे - मर्यादा सोडणे.
 आईबाबांना आपमन करून विलासने उंबरठा ओलांडला.

उत्तेजन देणे - प्रोत्साहन देणे.
शाहू महाराजांनी बाबासाहेबांना शिक्षणासाठी उत्तेजन दिले.

कंठ दाटून येणे - गहिवरून येणे, रडू येणे.
मित्राची वाईट अवस्था पाहून तिचा कंठ दाटून आला.

कानाडोळा करणे -  दुर्लक्ष करणे.
आईने पियुच्या चुकांकडे कानाडोळा केला.

कंबर कसणे  - तयार होणे.
दिक्षा ने स्पर्धा परीक्षेसाठी कंबर कसली.

कान देणे - लक्षपूर्वक ऐकणे.
सरांनी सांगितलेली कथा मुलांनी कान देऊन ऐकली.

कानात वारे शिरणे - बेभान होणे.
वासरू कानात वारे शिरल्यासारखे धावत सुटले.

कानामागे टाकणे- दुर्लक्ष करणे.
आईने आपल्या मुलाच्या सर्व चुका कानामागे टाकल्या.

काखा वर करणे - आपल्याजवळ काही नाही असे दाखवणे.
आईच्या आजारपणात महेश दादाकडे पैसे मागायला आला तेव्हा दादांनी काखा वर केल्या.

केसाने गळा कापणे - वरकरणी प्रेम दाखवून कपटाने घात करणे.
रमेशने आपल्या मित्राचा केसाने गळा कापला.

कानोसा घेणे- अंदाज घेणे
रात्री कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज ऐकून राजुने कानोसा घेतला.

कागाळी करणे - तक्रार करणे.
सम्यकने आईकडे पियुषची कागाळी केली.

कंप पावणे - थरथरणे.
भूकंप आल्यावर जमीन कंप पावली.

कोसळणे - जोरात पडणे.
भरपूर पावसामुळे झाडे कोसळली.

कुरवाळणे - गोंजारणे.
आई आपल्या मुलाला कुरवाळते.

कान झाकून घेणे - न ऐकणे, दुर्लक्ष करणे.
शिक्षक शिकवत असताना राजेशने कान झाकून घेतले.

करुणा करणे -  दया दाखवणे.
सर्व प्राण्यांवर करुणा करावी.

खडानखडा माहिती असणे - बारीकसारीक गोष्टी माहिती असणे.
मोगलीला जंगलाची खडानखडा माहिती होती.

खळगी भरणे- पोट भरणे.
दगडू दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून खळगी भरतो.

खंड पडणे- काम मध्येच थांबणे.
धोरणामुळे रामराव यांच्या घराच्या कामात खंड पडला.

खो घालने- कामात विघ्न आणणे.
स्वतःच्या स्वार्थासाठी रमेशने दिलीपच्या कामात खो घातला.

गुबगुबीत होणे - लठ्ठ होणे.
राजू चमचमीत खाऊन गुबगुबीत झाला.

गळ घालणे -अतिशय आग्रह करणे.
दिपकने विशालला मुंबईला येण्यासाठी गळ घातली.

गुजराण करणे - निर्वाह करणे.
लॉकडाऊन काळात मिळेल ते खाऊन लोकांनी आपली गुजराण केली.

गर्भगळीत होणे - अतिशय घाबरणे.
समोर पोलिसांना पाहून चोर गर्भगळीत झाले.

घाबरगुंडी उडणे - खूप घाबरणे.
 साप दिसल्यावर अनुजाची घाबरगुंडी उडाली.

घाम गाळणे  - कष्ट करणे.
 शेतकरी दिवसभर शेतात घाम गाळतो.

घर डोक्यावर घेणे -  खूप दंगा करणे.
सुट्टीच्या दिवशी मुलं घर डोक्यावर घेतात.

चिंतेत पडणे  - काळजीत पडणे.
चैतन्य घरी लवकर आला नाही त्यामुळे आई चिंतेत पडली.

चक्कर मारणे - फेरफटका मारणे.
आजोबा नातवासोबत बागेत चक्कर मारून आले.

जळून खाक होणे- पूर्ण जळून राख होणे.
घराला लागलेल्या आगीत घरातील वस्तू जळून खाक झाल्या.

जीभ सैल सोडणे- वाटेल तसे बोलणे.
रागाच्या भरात दिपक ने मित्रावर जीभ सैल सोडली.

झुंबड उडणे- खूप गर्दी होणे.
कोरोनानंतर दुकानात खरेदीसाठी झुंबड उडाली.

झेंडू फुटणे- खूप भीती वाटणे.
अचानकपणे समोर आलेला साप पाहून विशालला झेंडू फुटला.

टोमणा मारणे- खोचकपणे बोलणे.
सासूने सुनेला कामावरून टोमणा मारला.

डोळ्याचे पारणे फिटणे -  अतिशय प्रसन्न होणे.
मनाली ने शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवल्यावर बाबांच्या डोळ्याचे पारणे फिटले.

डोळा लागणे -  झोप लागणे.
पियुषचा टीव्ही बघत बघत डोळा लागला.

डोक्यावर बसवणे- फाजील लाड करणे. 
उषाने आपल्या मुलाला डोक्यावर बसवले आहे.

डोळ्यात खुपणे- मत्सर करणे. 
अजमलची झालेली प्रगती पाहून शेजाऱ्यांच्या डोळ्यात खुपते.

डोळा लागणे- झोप लागणे.
दिवसभर शेतात काबर कष्ट केल्यामुळे बाबांचा लगेच डोळा लागला.

डोळेझाक करणे- दुर्लक्ष करणे.
स्नेहाच्या चुकांकडे डोळेझाक केल्यामुळे तुझ्या आईला पश्चाताप होतो आहे.

तणतणत निघून जाणे- खूप रागाने निघून जाणे.
आईचे बोलणे ऐकून अन्सार तणतणत निघून गेला.

तल्लीन होणे- गुंग होणे.
दादा खेळून आल्यावर अभ्यास करण्यात तल्लीन झाला.

ताव मारणे  -  भरपूर खाणे.
हॉटेलमध्ये गेल्यावर सम्यकने रोटीवर ताव मारला.

तोंड देणे - सामना करणे.
सर्व भारतीयांनी कोरोनाच्या संकटाला धैर्याने तोंड दिले.

दम लागणे- धाप लागणे.
मेघना जोरात धावत आल्यामुळे तिला दम लागला.

दिवस फिरणे- वाईट दिवस येणे.
कुलदीपच्या वडिलांचा अपघतात मृत्यू झाल्याने त्यांचे
दिवस फिरले.

धूम ठोकणे- पळून जाणे.
पोलिसांना पाहताच चोराने धूम ठोकली.

धारातीर्थी पडणे- लढाईत मरण येणे.
तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले.

नाव मिळवणे- कीर्ती मिळवणे.
दिपकने अतिशय कष्ट करुन नाव मिळवले.

पाठ थोपटने- शाबासकी देणे.
आशिषने केलेला अभ्यास पाहून सरांनी त्याची पाठ थोपटली.

पाठबळ असणे- आधार असणे.
दादाला त्याच्या सर्व कामात बाबांचे पाठबळ होते.

पोटात कावळे ओरडणे  - खूप भूक लागणे.
जेवायला उशीर झाल्यावर राजुच्या पोटात कावळे ओरडायला लागले.

प्रशंसा करणे - स्तुती करणे.
अक्षय ने वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्याची सर्व शिक्षकांनी प्रशंसा केली.

पोटाशी धरणे - मायेने कुशीत घेणे.
आई आपल्या तान्ह्या बाळाला पोटाशी धरते.

पारा चढणे - राग येणे.
वर्गात मुलांचा गोंधळ पाहून शिक्षकांचा पारा चढला.

प्राणाला मुकले - जीव जाणे, मरण येणे.
कोरोनामुळे जगात अनेक लोक आपल्या प्राणाला मुकले.

आलंकारिक शब्द 

फडशा पडणे-  खाऊन संपवणे.
वाघाने हरणाचा फडशा पडला.

बाचाबाची होणे - शाब्दिक भांडण होणे.
अजय आणि विजयमध्ये शुल्लक कारणावरून बाचाबाची झाली.

बेत करणे - योजना आखणे.
आज आईने पोळ्यांचा बेत केला.

भारी वाटणे- चांगले वाटणे.
आकांक्षा चं गाणं मला खूप भारी वाटलं.

मुठीत असणे- ताब्यात असणे.
 हे सर्व पोलिस स्टेशन इन्स्पेक्टर म्हणून माझ्या मुठीत आहे.

मान्य करणे - कबूल करणे.
सुमितने त्याची चूक आईसमोर मान्य केली.

मार्ग काढणे - रस्ता काढणे, मार्ग काढणे.
जंगलातून जात असताना सुजयने मार्ग काढला.

मुग्ध होणे - मोहित होणे.
 स्मिताचा नृत्याविष्कार पाहून सर्व प्रेक्षक मुग्ध झाले.

दिवस पालटणे - चांगले दिवस येणे.
पाऊस पडल्यावर शेतकऱ्याचे दिवस पालटले.

देखरेख करणे - राखण करणे.
मनोज घराची खूप चांगली देखरेख करतो.

दंग असणे  - मग्न असणे.
वारकरी कीर्तनात दंग झाले

धुळीस मिळणे  - नष्ट होणे.
मुसळधार पावसाने भाताचे पीक धुळीस मिळाले.

धडपड करणे - खूप कष्ट करणे.
बाबा मुलांच्या शिक्षणासाठी खूप धडपड करतात.

नाळ तोडणे - संबंध तोडणे.
अजय मुंबईला आल्यापासून त्याची आपल्या भावाची नाळ तुटली.
 




रस असणे  - रुची असणे, आवड असणे.
अनुला गाणी म्हणण्यात रस आहे.

लळा लागणे - ओढ वाटणे.
भरपूर दिवस गावी राहिल्यामुळे पियुषला वासराचा लळा लागला.

वनवन करणे - खूप भटकणे.
राजुने कामासाठी दिवसभर वनवन केली.

वीरगती प्राप्त होणे - देशासाठी लढताना मरण येणे.
युद्धात लढताना भारतीय जवानांना वीरगती प्राप्त झाली.

सुगावा लागणे  - शोध लागणे, तपास लागणे.
पोलिसांना चोराचा सुगावा लागला.

समाधानाची ढेकर देणे - जेवून तृप्त होणे.
आईने केलेल्या पुरणपोळ्या खाऊन पियूषने समाधानाचा ढेकर दिला.

संघर्ष करणे - झुंजणे, लढणे.
देशाच्या संरक्षणासाठी भारतीय जवान सीमेवर संघर्ष करतात.

संकल्प करणे - एखादी गोष्ट करण्याचा निश्चय करणे.
आयुषने दररोज व्यायाम करण्याचा संकल्प केला.

सतर्क असणे - दक्ष असणे.
पोलिस नेहमीच लोकांच्या सेवेसाठी सतर्क असतात.

स्तुती करणे - प्रशंसा करणे, गुणगान गाणे.
सम्यकने परीक्षेत चांगले गुण मिळवल्यानंतर शिक्षकांनी त्याची स्तुती केली.

सहाय्य करणे  - मदत करणे.
लोकांनी पूरग्रस्तांना खूप सहाय्य केले.

हंबरडा फोडणे - मोठ्याने रडणे.
वडील अपघातात गेल्याचे समजताच ताईने हंबरडा फोडला.

हात देणे- मदत करणे.
आजारपणाच्या काळात माझ्या भावाने मला हात दिला.

हातावर तुरी देणे- फसवून पळून जाणे.
बघता बघता चोरांनी पोलिसांच्या हातावर तुरी दिली.

हरभऱ्याच्या झाडावर चढवणे- खोटी स्तुती करणे.
अजय चा खेळ पाहून त्याच्या मित्राने त्याला हरभर्‍याच्या झाडावर चढवले.

हाय खाणे- धास्ती घेणे.
नवऱ्याच्या अपघातानंतर निर्मलाने हाय खाल्ली.

हायसे वाटणे- समाधान वाटणे.
युक्रेन मधून आपला मुलगा सुखरूप घरी आलेला पाहून त्याच्या आईला हायसे वाटले.

हुलकावणी देणे- फसवणे.
दिव्या लंगडी मध्ये चांगली हुलकावणी देते.


Thanks. Visit Again.

टिप्पणी पोस्ट करा

25 टिप्पण्या

  1. मालामोम होन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा

    उत्तर द्याहटवा