आलंकारिक शब्द
आलंकारिक शब्द म्हणजे काय?
ज्याप्रमाणे अलंकार, पोशाख, केशरचना या मानवाच्या सौंदर्यात भर घालतात; तसेच म्हणी, वाक्प्रचार, अलंकारिक शब्द भाषेचे सौंदर्य वाढवतात. सर्व भाषामध्ये यांचा वापर केला जातो. कमी शब्दामध्ये व्यापक अर्थ अलंकारिक शब्दातून सांगितला जातो. आलंकारिक शब्दाचा शाब्दिक अर्थ लक्षात न घेता त्यामागील भावार्थ समजून घेणे आवश्यक असते. म्हणून आलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ माहीत असणे आवश्यक आहे. आलंकारिक शब्दांचा अर्थ माहित नसेल तर त्यातून चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो. या लेखात मराठीमध्ये वापरल्या जाणाऱ्या अशाच काही अलंकारिक शब्द व त्यांचा अर्थ जाणून घेऊयात.
आलंकारिक शब्दाचा दैनंदिन व्यवहारात वापर तर होतोच त्याचबरोबर साहित्य लेखनामध्येही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या शब्दावर आधारित अनेक प्रश्न सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षामध्ये विचारले जातात. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी, शिष्यवृत्ती परीक्षेसाठी व इतर वापरासाठी हे शब्द व अर्थ समजून घेणे आवश्यक आहे.
अलंकारिक शब्द अर्थ
अष्टपैलू - सर्व गुणसंपन्न
अकलेचा कांदा - मूर्ख.
अरण्य पंडित - मूर्ख मनुष्य
अकरावा रुद्र - अतिशय तापट माणूस.
अळवावरचे पाणी - फार काळ न टिकणारी वस्तू.
अकलेचा खंदक - अत्यंत मूर्ख माणूस.
उंटावरचा शहाणा - मूर्खपणाचा सल्ला देणारा
उंबराचे फूल - अत्यंत दुर्मिळ वस्तू.
कर्णाचा अवतार - दानशूर, उदार माणूस.
कळसूत्री बाहुली - दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा.
कळीचा नारद - भांडण लावून देणारा.
कुंभकर्ण - झोपाळू माणूस.
कूपमंडूक - संकुचित वृत्तीचा मनुष्य.
खडाजंगी - जोरदार मोठे भांडण.
काडी पहिलवान - हाडकुळा मनुष्य.
खुशाल चेंडू - चैनीखोर मनुष्य.
खेटराची पूजा - अपशब्दाने खरडपट्टी काढणे.
गर्भ श्रीमंत - जन्मापासून श्रीमंत.
गंगा यमुना - अश्रू.
गंडांतर - भीती दायक संकट.
गाजर पारखी - कसलीही पारख नसलेला.
गुरुकिल्ली - मर्म, रहस्य.
गुळाचा गणपती - मंदबुद्धीचा.
गोगलगाय - गरीब निरुपद्रवी मनुष्य.
घर कोंबडा - घराबाहेर न पडणारा.
घोरपड - चिकाटी धरणारा.
चर्पटपंजरी - निरर्थक बडबड.
चौदावे रत्न - मार.
छत्तीसचा आकडा - शत्रुत्व.
जमदग्नीचा अवतार - रागीट .
टोळभैरव - नासाडी करणारे लोक.
ताटाखालचे मांजर - दुसऱ्याच्या तंत्राने वागणारा.
त्रिशंकू - धड ना इकडे, ना तिकडे.
दगडावरची रेघ - कधीही न बदलणारे.
देव माणूस - चांगला सज्जन माणूस.
धोपट मार्ग - सरळ, अचूक मार्ग.
नवकोट नारायण - खूप श्रीमंत.
नंदीबैल - हो ला हो म्हणणारा.
पर्वणी - अतिशय दुर्मिळ योग.
पाताळयंत्री - कारस्थान करणारा.
पांढरा कावळा - निसर्गात नसलेली वस्तू.
पांढरा परीस - लबाड माणूस.
पिकले पान - म्हातारा मनुष्य.
पोपटपंची - अर्थ न समजता पाठांतर करणे.
बृहस्पती - बुद्धिमान मनुष्य.
बिन भाड्याचे घर - तुरुंग.
बोके संन्यासी - ढोंगी मनुष्य.
बोलाचीच कढी - केवळ शाब्दिक वचन.
भगीरथ प्रयत्न - अटोकाट प्रयत्न.
भाकड कथा - बाष्कळ गोष्टी.
भीष्मपतिज्ञा - कठीण प्रतिज्ञा.
मंथरा - दुष्ट स्त्री.
मायेचा पूत - मायाळू माणूस.
मारुतीचे शेपूट - लांबत जाणारे काम.
मृगजळ - केवळ आभास.
मेषपात्र - बावळट मनुष्य.
रामबाण औषध - अचूक गुणकारी.
लंकेची पार्वती - अत्यंत गरीब स्त्री.
लंबकर्ण - बेअकली मनुष्य.
वाटाण्याच्या अक्षता - नकार.
वामन मूर्ती - बुटका माणूस.
वाहती गंगा - आलेली संधी.
शकूनी मामा - कपटी मनुष्य.
श्रीगणेशा - आरंभ करणे.
स्मशान वैराग्य - तात्कालिक वैराग्य.
सांभाचा अवतार - अत्यंत भोळा मनुष्य.
सुळावरची पोळी - जीव धोक्यात घालणारे काम.
शेजारधर्म - शेजाऱ्यांची चांगल्या तऱ्हेने वागण्याची पद्धत.
शेंदाड शिपाई - भित्रा मनुष्य.
2 टिप्पण्या
Thanks🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
उत्तर द्याहटवाWelcome
उत्तर द्याहटवा